राज्यात पुन्हा 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता – आरोग्य मंत्री राजेश टोपे

ब्युरो रिपोर्ट,
24सात । मराठी

राज्यात आणखी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्यामुळे 1 जूनपासून पुन्हा 15 दिवस लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे सुतोवाच केले आहे. राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेलं पाहिजे. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता लॉकडाऊन वाढवण्याचा विचार सुरू आहे. तसेच गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत. ज्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण कमी झालं तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल, असं टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या झोळीत जेवढी इंजेक्शन्स तेवढ्यांचं वाटप

म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांनी उपचार घ्यावेत. एकूण 131 रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत, असं ते म्हणाले. तसेच म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ते वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचं नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या झोळीत जेवढे इंजेक्शन टाकते त्याप्रमाणेच वाटप केलं जात आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. इंजेक्शन्स उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यात म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन्सचं उत्पादन सुरू केल्याने त्यांनी गडकरींचं अभिनंदन केलं. त्यामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन्स मिळतील, असंही ते म्हणाले.

लोकांची आणि लोकप्रतिनिधींची चिंता

हिंमत असेल तर राज्य सरकारने दोन दिवसाचं अधिवेशन घ्यावं, असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अधिवेशन आम्ही नेहमीच घेत आलो आहोत. सर्व विषयावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. जे वैधानिक विषय आहेत ते आम्ही घेणारच आहोत. आम्हाला लोकांची आणि लोकप्रतिनिधींचीही काळजी आहे. फक्त आम्ही शास्त्रीय पद्धतीने विचार करतोय, असा चिमटाही त्यांनी काढला.