डिसेंबरपर्यंत लाॅकडाऊनचे निर्बंध उठवण्याची घाई करु नका; वैद्यकीय तज्ञांचा सल्ला

ब्युरो रिपोर्ट,
24सात । मराठी

राज्यात सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 1 जूनला संपणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनला 15 दिवसांची मुदतवाढ दिली जाईल, असे वक्तव्य केले आहे.

अशातच, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी डिसेंबरपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध उठविण्याची घाई करू नका, असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. राज्यात कोरोनाबाधितांच आकडा कमी होत असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली जात आहे.

मात्र वैद्यकीय तज्ज्ञांनी याविरोधात भूमिका घेत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी याबाबत सांगितले की, राज्याला डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांचा हा वेग कमी करण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळे डिसेंबरपर्यंत हळूहळू निर्बंध उठवणे गरजेचे आहे. जर घाईघाईने निर्बंध उठवले तर पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळेल. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्याही अधिक आहे तसेच लसीकरणही धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे निर्बंध पूर्णतः उठवणे चुकीचे ठरेल, अशी सूचना साळुंखे यांनी राज्य सरकारला केली आहे.