केज तालुक्यातील उद्योजकाची विजचोरी पकडली, दोन लाखांचा दंड आकारला

प्रतिनिधी,
24सात | मराठी

केज तालुक्यात वीज चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनाधिकृतपणे आकडे टाकुन चोरी किंवा विद्युत मिटर बंद करून चोरी यासह घरगुती वापरासाठीच्या कनेक्शनवर व्यवसाय चालवणे. अशा अनेक मार्गातुन विजचोरांमुळे केजच्या महावितरणवर अधिभार पडत आहे. ज्यामुळे महावितरणने वीजचोरी विरोधात आपली मोहीम सुरु केल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महावितरणच्या ग्रामीण-2 भागात अनाधिकृतपणे वीजचोरांना पकडून लाखों रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

तर 2 जुन रोजी उमरी फाटा येथील विटभट्टी उद्योजक श्रीनिवास भाऊराव चाळक यांनी घरगुती वापरासाठी असलेल्या वीज कनेक्शनवर वीट उद्योगसाठी वापर केल्याचे महावितरणने उघड करत धाड टाकुन वीज चोरी समोर आणली. संबंधित उद्योजकाविरोधात भारतीय विद्युत कायदा 2003 अंतर्गत कलम 135 अन्वये 199930 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हि रक्कम एकरकमी न भरल्यास संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सदरील कार्यवाहीमुळे तालुक्यातील विजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. लाॅकडाऊन काळात वीज बील वसुली थंडावली असतानाच वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर अधिकचा भार पडत आहे.