लग्नासाठी वधूने दिली जाहिरात, दोन्ही लस घेतलेला वर पाहिजे

ब्यूरो रिपोर्ट,
24सात । मराठी

जगभरात विचित्र प्रकरणे पाहिली जातात, परंतु असे एक प्रकरण समोर आले आहे; ज्याबद्दल जाणून घेतल्यानंतर आपण देखील विचार कराल. लग्नासाठी वर्तमानपत्रातील वैवाहिक जाहिरात तुम्ही पाहिलीच असेल. परंतु ताज्या प्रकरणात, एका महिलेने लग्नासाठी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एका वराची मागणी केली आहे. वर्तमानपत्रात छापलेल्या या वैवाहिक जाहिरातीची क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

ही जाहिरात 4 जून 2021 रोजी एका वर्तमानपत्रातील वैवाहिक जाहिरातीवर दिसून आली आहे. जाहिरातीमध्ये रोमन कॅथोलिक असलेल्या एका महिलेने लग्नासाठी आपल्या धर्मातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती, परंतु त्यातही तिने एक अतिरिक्त अट ठेवलेली आहे.

काय आहे वधु ची मागणी

त्या महिलेने असा दावा केला आहे की तिने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि आता कोविशिल्ड लसीचेच दोन्ही डोस घेतलेल्या वराचा शोध ती घेत आहे. जाहिरातीत तिने तिचे वय 24 वर्षे दिलेले आहे, तर 28 ते 30 वर्षे वय असलेल्या आणि पदव्युत्तर शिक्षण झालेल्या स्वयंरोजगार मुलाने आपली माहीती तिच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी असे तिने जाहिरातीमध्ये नमुद केले आहे.

खासदार शशी थरूर यांनीही ट्विट केले आहे.

कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर त्यांच्या वक्तृत्व, शब्दसंग्रह आणि वादविवादात विरोधकांना तोंड देण्यासाठी प्रसिध्द आहेत. ते अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयावर ट्विट करत असतात. खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी या प्रकरणात एक गमतीशीर ट्विट केले आहे.

त्यांनी लिहिले आहे, ‘लसीकरण झालेल्या वधूने लस मिळालेल्या वराची मागणी करने! यात काही शंका नाही, आपल्या आवडीच्या जोडीदारासाठी हा एक बुस्टर शाॅट असेल? हे आमचे New Normal होणार आहे का?