केजचा राजा या गावरान आंबा स्पर्धेचा निकाल जाहीर

प्रा. हनुमंत भोसले,
24सात । मराठी


केज तालुक्यातील सर्वात गोड व चवदार आंब्याच्या गावरान प्रजाती जपल्या जाव्यात याकरिता रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने “केजचा राजा” या नावाने सर्वोत्कृष्ट गोड व चवदार आंब्याची निवड करण्यासाठी गावरान आंबा स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत तालुक्यातील प्रत्येक गावातून किमान एक प्रवेशिका अपेक्षित होती मात्र कोरोना महामारी व लॉकडाऊनची अडचण असल्यामुळे या स्पर्धेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. असे असताना देखील एकूण 13 प्रवेशिका या स्पर्धेसाठी दाखल झाल्या होत्या.

या स्पर्धेत आंब्याचा आकार, सुगंध व रसदारपणा, गोडी आणि चवदारपणा इत्यादीद्वारे गुणांकन करण्यात आले. या स्पर्धेत अंतिम गुण तालिकेनुसार पुढील प्रमाणे मानांकन मिळाले आहे. या स्पर्धेत डॉ उमाकांत रावसाहेब मुंडे व गणेश भास्करराव धस, यांच्या आंब्याला प्रथम क्रमांक (रुपये 1500 विभागून) मिळाला. तर सीता अजयराव बनसोड व शिवाजी हरिभाऊ ईखे यांच्या वनराज या आंब्याना दुसऱ्या क्रमांकाचे (रु 1000 विभागून) बक्षीस मिळाले आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचे (रु 500) बक्षीस विजय पुरुषोत्तम जॅकेटिया यांच्या आंब्याला मिळाले. या स्पर्धेत हिरकन विश्वास गायकवाड व सौ सुचिता रमाकांत डिकले यांच्या आंब्याना (रु 251) विशेष प्रोत्साहन म्हणुन पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रोटरी क्लब ऑफ केज चे अध्यक्ष रो. हनुमंत भोसले, सचिव रो. धनराज पुरी, माजी अध्यक्ष रो. अरुण अंजाण, भावी अध्यक्ष रो. बापूराव सिंगण व सदस्य रो. भीमराव लोखंडे यांनी काम पाहिले आहे.

पुढील वर्षी 25 मे ते 15 जून या काळात केज शहरात प्रत्यक्ष भव्य गावरान आंबा प्रदर्शन भरवण्याचे रोटरी ने ठरवले आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण 21 जुन रोजी घेण्यात येणार असून त्याबद्दलची माहीत स्पर्धकांना कळवली जाईल. असे रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने सांगण्यात आले आहे.