आयुर्वेदाचा पुरस्कार करणारे बाबा रामदेव कोरोना विरोधातील लस घेणार का?

ब्युरो रिपोर्ट,
24सात । मराठी

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच योगगुरू बाबा रामदेव यांच्या वक्तव्यांमुळे होमिओपॅथी विरुद्ध अ‍ॅलोपॅथी असा वाद सुरू झाला होता. दरम्यान, आता बाबा रामदेव यांनी कोरोना लसीबाबत मोठे विधान केले आहे.

आयुर्वेदाचा पुरस्कार करणाऱ्या बाबा रामदेव यांना कोरोनाविरोधातील लस घेणार का अशी विचारणा केली असता त्यांनी कोरोनावरील लस घेणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

मात्र आपल्या जीवनात योग आणि आयुर्वेदाचा समावेश केला पाहिजे. योग हा आजारपणांसमोर एखाद्या ढालीप्रमाणे आहे. योग कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीपासून रक्षण करतो. मात्र शस्त्रक्रिया आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अ‍ॅलोपॅथी ही सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती आहे. माझा कुठल्याही संघटनेला तसेच उपचारपद्धतीला विरोध नाही. माझी लढाई तर ड्र्ग माफियांविरोधात आहे. चांगले डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूतांप्रमाणे आहेत. मात्र अनावश्यक औषधे आणि उपचारांच्या नावाखाली कुणाचेही शोषण करता कामा नये. गेल्या काही दिवसांपासून आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात अ‍ॅलोपॅथीवरून वाद सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांनी डॉक्टरांबाबत काही वादग्रस्त विधाने केली होती. त्यानंतर आयएमएशी संबंधित डॉक्टरांनी रामदेव बाबांवर आक्षेप घेतला होता. मात्र बाबा रामदेव यांनी आपल्या विधानांवर स्पष्टीकरण देताना याबाबत खेद व्यक्त केला होता. दरम्यान रामदेव बाबांच्या या मुक्ताफळांनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही त्यांना पत्र लिहून त्यांनी केलेल्या विधानांवर आक्षेपही घेतला होता. तसेच बाबा रामदेव यांच्या विधानांविरोधात अनेक शहरांमध्ये तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.