पलटी झालेल्या ट्रकमधुन 70 लाखांचे एलईडी, मोबाईल गावकऱ्यांनी पळवल्या

नईम शेख,
24सात । मराठी


कोंबड्यांपासून मद्यापर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे अपघात झाल्यानंतर त्यांची पळवापळवी होत असल्याचं आधीही अनेकदा आपण पाहिले आहे. मात्र उस्मानाबाद येथे ट्रक उलटल्यानंतर त्यातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पादचारी आणि गावकऱ्यांनी तब्बल 70 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा दावा ट्रक मालकाकडून केला जात आहे. ही उपकरणे परत मिळवण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

सोलापूर-औरंगाबाद हायवेवर ट्रक उलटला

सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता. “ट्रकमध्ये मोबाईल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही, खेळणी अशी विद्युत उपकरणे होती. अपघातानंतर ती रस्त्यावर पडली होती, तेव्हा गावकऱ्यांची त्या वस्तू उचलण्यासाठी झुंबड उडाली. तर काही जणांनी कंटेनरचा दरवाजा उघडून वस्तू लांबवल्या. स्थानिक नागरिक ट्रक मधील वस्तू चोरत असल्याचे पाहुन पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं.” अशी माहिती ट्रक चालकाने दिली.

40 टक्के वस्तू परत मिळाल्या

पोलिसांच्या आवाहनानंतर काही जणांनी वस्तू परत केल्या. त्यानंतर उर्वरित वस्तू शोधण्यासाठी पोलीस गावात हिंडू लागले. मात्र ट्रक मालकाकडून 70 लाखांच्या वस्तू लुबाडल्याचा दावा केला जात असून त्यापैकी 40 टक्के वस्तू परत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तर सर्च ऑपरेशन अजूनही सुरु असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी सांगितले आहे.