राज्य महामार्गाचे काम पुर्ण करण्यासाठी केज मध्ये रस्ता रोको

इक्बाल शेख,
24सात । मराठी


केज शहरातील दोन्ही महामार्गाचे रखडलेले काम दोन महिन्यांच्या आत पूर्ण करू अशी लेखी हमी दिल्यानंतर एक तास चाललेले रस्ता रोको आंदोलन केज विकास संघर्ष समितीने माघार घेतले.

केज शहरातून जाणाऱ्या खामगाव- पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर या दोन महामार्गाचे शहर अंतर्गत काम गेली दीड वर्षांपासून अत्यंत रखडत व धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे कांही ठिकाणी कामाचा दर्जा ही टिकून राहिलेला नाही. केज- कळंब रोडवरील मोंढ्यानजीक पुलाचे काम तसेच पिसाटी नदीवरील पुलाचे काम थांबलेले होते. मोंढ्यातून तयार केलेला पर्यायी रस्ता देखील खराब झाला होता. शहरातील चौकांचे व इतर कामे नव्याने करणे अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक व भवानी चौकाच्या मध्ये असलेले सर्व अतिक्रमणे व अडथळे तात्काळ काढणे गरजेचे आहे. या सर्व मागण्यासाठी केज विकास संघर्ष समितीने 21 जून रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

त्यानुसार समितीने सोमवार दि 21 जून रोजी मोंढा पर्यायी रस्त्यावर एक तास रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनापूर्वी दोन दिवस अगोदर दोन्ही कंपन्यांनी केज तहसीलदार यांच्या समवेत बैठकीत समितीला काम तात्काळ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तोंडी अश्वासनावर विश्वास न ठेवता समितीने रस्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही कंपन्यांचे अधिकारी यांनी दोन महिन्यात दोन्ही पुलांचे व शहरातील महामार्गाचे अपूर्ण काम पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर समितीच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात समितीचे समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे, भाई मोहन गुंड यांच्यासह नागरिक सहभागी होते. यावेळी ए.पी.आय. मिसळे यांनी आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.