राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता

इक्बाल शेख,
24सात । मराठी

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा धोका वाढला आहे. त्यातच राज्यात गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहून राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.

अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सेवांवर बंधने

दोन दिवसांत राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत. काही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाल्याचं समजते. आत्यवशक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

धोका वाढल्याने सतर्कता

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये. तसेच डेल्टा प्लस व्हेरियंट तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, हा धोका ओळखून राज्य सरकार निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचं समजते.

निर्बंध शिथिलीकरणाच्या धोरणातही बदल

कोरोना रुग्णांचे साप्ताहिक प्रमाण आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली होती.

दर आठवड्याला परिस्थितीनुसार निर्बंध कमी -जास्त प्रमाणात लागू करण्याचे धोरण सध्या राज्यात आहे. सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत.

गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

गेल्या काही दिवसांपासून १० हजारांच्या खाली गेलेली कोरोनाबाधितांच्या दिवसभरातील संख्येत बुधवारी काही प्रमाणात वाढ झाली. त्यानुसार, दिवसभरात १० हजार ६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला.