बायको किर्तनाला गेली म्हणुन नवऱ्याची भर किर्तनात तलवारबाजी

प्रतिनिधी परळी,
24सात । मराठी

पत्नी किर्तन ऐकायला गेली म्हणून संतप्त झालेल्या पतीने भरकिर्तनात दगडफेक व तलवारबाजी करून गोंधळ घातल्याचा प्रकार परळी तालुक्यातील मालेवाडी येथे घडला आहे. या प्रकरणात मारहाण झालेल्या पत्नीसह सोडवासोडवी करणाऱ्या अन्य चार जणांना दुखापत झाली आहे. याप्रकरणी या पिडीत महिलेनेच पत्नीविरुद्ध फिर्याद दाखल केली असुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.६ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी पासुन जवळच असलेल्या मालेवाडी येथे मारोती मंदिरात किर्तनाचा कार्यक्रम होता. व्याकरणाचार्य ह.भ.प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे किर्तन सुरु होते. या किर्तनाला आरोपी माणिक कुंडलिक बदने यांची पत्नी गेलेली होती. दरम्यान बायको किर्तनाला का गेली? म्हणून संतप्त झालेल्या माणिक बदने हा हातात तलवार घेऊन किर्तन सुरु असलेल्या ठिकाणी आला. यानंतर बायकोजवळ जाऊन तु कोणाला विचारुन किर्तनाला आलीस? असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी इतरांनी भांडण सोडवासोडवी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने संतप्त होत दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच हातातील शस्त्र फिरवु लागला या झटापटीत साक्षीदार सुदामा पंडीतराव आंधळे, सरपंच भुराज, वैजनाथ बदने, आदिनाथ संभाजी बदने, भरत रामकिसन आंधळे यांनाही दुखापत झाली. याप्रकरणी पत्नीनेच फिर्याद दिल्यावरुन आरोपी पती विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं136/2021 कलम
324, 336, 337, 323, 504 भादंवि व 4/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि जिरगे हे करीत आहेत.