पुलावरुन इंडिकासह दोन मोटारसायकल वाहुन गेल्या, एक युवक बेपत्ता

रंजित कांबळे,
24सात । मराठी


उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी, मेंढा, लासोना, सांगवी, कामेगाव बोरगाव, बोरखडा टाकळी, कनगरा आदी गावात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे तेरणा आणि सवळा नदी संगम दोन्ही नद्या काठोकाठ वाहू लागल्या आहेत.

बोरखेडा गावालगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून एक मोटारसायकल वाहून गेली असून त्यात एक युवक बेपत्ता झालेला आहे. तसेच मेंढा गावाजवळ एक इंडिका कार वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. तसेच मेंढा गावात अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील समीर ईनुस शेख (वय २८) हा तरुण उस्मानाबाद येथील आपले काम उरकून मोटर सायकल वरून कनगरा या आपल्या गावी परत येत होता. बोरखेडा गावालगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून वाहत्या पाण्यात मोटारसायकल सह वाहून गेला आहे. अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. शोधकार्य सुरु आहे.

मेंढा येथील गोवर्धन ढोरमारे आणि बाबा कांबळे हे आपल्या इंडिका कारमधून समुद्रवाणी या गावाहून मेंढा गावी जात असताना समुद्रवाणी गावालगत असलेल्या ओढ्यावरून त्यांची इंडिका कार पाण्यात वाहून गेली. गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाहत्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. तर पाडोळी येथील अजित बोचरे शेतातुन गावाकडे येत असताना त्यांची मोटरसायकल एका कालव्यात वाहून गेली आहे यात ते सुखरूप बचावले आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नागरीकांनी छोट्या मोठ्या नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असताना खात्री करुनच रस्ता ओलांडावा. अति आत्मविश्वास धोकादायक ठरू शकतो. नदीतून वाहत्या पाण्याचा वेग खुप असतो ज्यामुळे अनेकांनी आपले जीव गमावलेल्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत.