बीड जिल्ह्यात भरदूपारी तरुणावर गोळीबार

गेवराई प्रतिनिधी,
24सात । मराठी


जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र सदरील तरुणाचे दैव बलवत्तर व वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले. घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे महामार्गालगत घर व बांधकाम साहित्याचे दुकान आहे. दरम्यान शुक्रवार दि.16 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता याठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला एका जणाने पिस्तूल लावून गोळी झाडली. यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला स्पर्ष करून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार व अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे हे करत आहेत.