शहरातुन मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

इक्बाल शेख,
24सात । मराठी


करोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार बीड जिल्हाधिकारी यांनी यासंबंधीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, केज शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या 31 नागरिकांवर तहसील प्रशासन आणि नगर पंचायत यांनी संयुक्त कारवाई केली असून प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 6 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. बीडमध्ये प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरत असल्याने करोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलिस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडत मास्क न लावणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यानुसार आता तहसील प्रशासन, नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाने केज शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर प्रत्येकी 200 रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई सुरू केली आहे.

केज तहसीलचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, नगर पंचायत चे स्वच्छता निरीक्षक असद खतीब, अय्युब पठाण, सय्यद अतिक, आझाद शेख यांनी ही कारवाई केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलीस तैनात केले असुन. यापुढे मास्क न लावता फिरणाऱ्यांवर अशी कारवाई सुरू राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी केले आहे.