ऊसतोड मजुराचे हरवलेले दिड लाख शिक्षकांनी परत केले

इक्बाल शेख,
24सात । मराठी


सध्याच्या संधीसाधू आणि मतलबी जगात अद्यापही माणूसकी टिकून राहिल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील केज येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आसलेल्या दोघांनी रस्त्यावर पडलेली पिशवी व त्यातील दिड लाख रुपयांची रोकड संबंधीत गरीब ऊसतोड कामगाराला परत केली. कारखान्याला ऊसतोडणीसाठी घेतलेली उचल हरवल्याने या मजुराच्या जीवाची घालमेल झाली होती. मात्र शिक्षक असलेले दोघेजण “गुरु पौर्णिमेदिवशी” देवरूपाने धावून आले आणि कुठलेही आढेओढे न घेता संबधीत मजुराला पैसे परत केले.

जिल्हा परिषद शिक्षक वसंत उद्धवराव तरकसबंद व त्यांचे मित्र फावडे संदेश अंबादास हे दोघेजण दररोज संध्याकाळी केज शहरातील चिंचपूर च्या मारुती मंदिराकडील रस्त्याने फिरायला जातात. नेहमीप्रमाणे ते आज फिरायला गेल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला एक कापडी पिशवी सापडली. ज्यामध्ये दिड लाख रुपये असल्याचे निदर्शनास आले. हे पाहुन त्या दोघांनी विचार केला. आपण पिशवी हातातच घेऊन चिंचपूर च्या मारुती चे दर्शन घेऊ. जेणेकरून ज्यांचे पैसे असतील ते आपल्याला पिशवी वरून ओळखतील आणि आपण त्यांचे पैसे परत करू. असा विचार करून ते दोघे चिंचपूर च्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी गेले. मात्र तिथे कोणीही त्यांना पैशाबद्दल विचारणा केली नाही. सापडलेल्या पैशाची पिशवी घेऊन ते दोघेही अस्वस्थ झाले होते. पैसे नेमके कोणाचे असावेत आणि ते कोणाला परत करावेत असा विचार दोघांच्या ही मनात येऊ लागला. मारुतीच्या दर्शनानंतर ते दोघेही पुन्हा परत केजकडे निघाले.

अर्ध्या रस्त्यात येताच समोरुन दोघेजण मोटार सायकलवरुन येऊन पिशवी बद्दल त्यांच्याकडे विचारणा करु लागले. वसंत तरकसबंद आणि संदेश फावडे यांनी त्या दोघांची चौकशी केली असता ते दोघे केज तालुक्यातील कोरेगाव येथील राहुल मुंडे आणि टाकळी येथील घुले होते. त्यांची चौकशी करुन ओळख पटल्यानंतर दिड लाख रुपयांची रक्कम त्यांचीच असल्याची खात्री पटली. यानंतर त्यांनी ते पैसे त्यांना परत केले.

सदरील व्यक्ती हे ऊसतोड कामगार होते त्यांनी ऊसतोडणीसाठी मुकादमाकडून उचल म्हणुन दिड लाख रुपये घेऊन गावाकडे परतत होते. पैसे परत मिळाल्यानंतर त्याचे हात पाय थरथर कापू लागले, आभार नेमके कसे मानायचे हे त्यांना समजेनासे झाले. तर वसंत तरकसबंद आणि संदेश फावडे यांना ज्यांचे पैसे होते त्यांना परत मिळाल्याचे समाधान वाटू लागले.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुजींनी कसे प्रामाणिकपणे वागावे अशीच शिकवण या दोघा शिक्षकांनी सर्व समाजाला दाखवून दिली आहे.