अतिवृष्टीमुळे केज शहरातील अनेकांच्या घरात पाणी; अनाथ मुलींच्या मदरस्याचेही नुकसान

इक्बाल शेख
24सात । मराठी

मराठवाड्यात गुलाब चक्रिवादळाच्या बसलेल्या फटक्यामुळे केज शहर व तालुक्यातील शेतीसह अनेकांच्या घरात पाणी घुसून घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेकांचे संसार उद्धवस्त होऊन कुटूंब रस्त्यावर आले आहे. प्रशासनाकडून मदत मिळेल तेंव्हा मिळेल मात्र आज उपजिविका भागवण्यासाठी भटकंती करत फिरण्याची वेळ अनेक गरीब कुटूंबांवर आलेली आहे.

शहरातील अजीजपूरा भागातील वास्तव्यास असलेले अनाथ मुलींच्या दारुल उलूम गौसीया मदरसा मध्ये पुराचे पाणी शिरल्याने मदरस्यातील सुमारे 40 मुलींना रात्री साडेनऊ वाजता सुरक्षित ठिकाणी रिटायर्ड लाईनमन सय्यद आरेफ भाई यांच्या घरी स्थलांतर करण्यात आले. मात्र त्यांच्यासाठी साठवून ठेवलेल्या जीवनावश्यक वस्तुंचा पाण्यामुळे सर्वनाश झाला आहे व मदरस्याची पडझडही झाली आहे.

आई वडील नसलेल्या 7 वर्षांपासून ते 16 वर्षे वयाच्या या लहान अनाथ बालिकांचे पुन्हा पुनर्वसन होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी व प्रतिष्ठित मंडळींनी आर्थिक किंवा जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य करावे व अनाथ मुलींचे पुन्हा पुनर्वसन करावे अशी मागणी मदरसा संचालक करत आहेत.