आरोग्य विभागाच्या परीक्षेत हायटेक काॅपी करताना तिघांना पकडले

आरेफ इनामदार
24सात । मराठी

अंबाजोगाई येथे आरोग्य विभागाच्या गट-ड पदांसाठी 16 केंद्रावर परिक्षा पार पडली. या परिक्षेसाठी एकूण 4,152 परीक्षार्थीपैकी 2,916 जणांनी उपस्थिती लावली. त्यापैकी दोन परिक्षा केंद्रावर तीन परिक्षार्थी हायटेक कॉपी करताना आढळून आल्याने उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. बाकी इतर सर्व केंद्रावर परिक्षा सुरळीत पार पडल्या.

आरोग्य विभागाच्या परीक्षेत काही परिक्षार्थी अत्याधुनिक उपकरणांच्या साह्याने कॉपी करणार असल्याची कुणकुण भरारी पथकाला आधीच लागली होती. त्यामुळे सर्व केंद्रांतील परीक्षार्थीवर करडी नजर ठेवण्यात येत होती. योगेश्वरी महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर भरारी पथक प्रमुख डॉ. चंद्रकात चव्हाण यांनी भेट दिली असता यावेळी त्यांना जनकसिंग शिवदास शिसोदे (रा. नागुनीची वाडी, गोलटगाव, औरंगाबाद) हा संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. डॉ. चव्हाण यांनी तपासणी केली असता त्याच्या पायातील बुटात इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळून आले. त्याच्या माध्यमातून कानातील रिसिव्हर द्वारे तो कॉपी करत होता. तर, शेजारच्या परिक्षा हॉलमध्ये विक्रम जादुसिंग बहुरे (रा. सागरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) हा देखील इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या साह्याने कॉपी करताना पर्यवेक्षक आनंद जोशी यांना आढळून आला. कॉपीची तिसरी घटना वेणूताई कन्या शाळेत उघडकीस आली. या ठिकाणी सचिन हिरालाल गोमलाडू (रा. रजपूतवाडी, देगाव रंगारी, औरंगाबाद) याने पॅनकार्ड कव्हरच्या आतमध्ये संशयास्पद मजकूर लिहून आणला होता. पर्यवेक्षक किरणकुमार सोनार यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्याकडून सदर पॅनकार्ड जप्त केले. हायटेक कॉपी करणाऱ्या या तिन्ही परिक्षार्थींना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र जोशी यांच्या फिर्यादीवरून त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरु होती.