केज नगर पंचायत मध्ये स्वीकृत सदस्यांची निवड

आरेफ इनामदार
प्रतिनिधी, 24सात । मराठी

केज : नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनासारख्या पक्षाला नाकारुन जनविकास परिवर्तन आघाडीला तिसरा पर्याय म्हणून बहुमताने निवडून दिले. मात्र केवळ निवडणुकीपुरतेच राजकारण करत सर्व हेवेदावे पक्षपात बाजुला ठेवून “शहराचा विकास हाच माझा ध्यास” असे म्हणत जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुनभाई इनामदार यांनी सर्व पक्षाला सोबत घेवून “आपण सगळेजण मिळून शहराचा विकास करु” असे म्हणत राजकारण्यांसमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.

नगराध्यक्ष पद जनविकास परिवर्तन आघाडीकडे ठेवत उपनगराध्यक्ष पद हे काँग्रेसकडे देण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वीकृत सदस्य पद देऊन सर्वपक्ष समभावाची भुमिका हारुनभाई इनामदार यांनी स्पष्टपणे निभावली.

मंगळवारी घेण्यात आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या मिटींगमध्ये दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुनभाई इनामदार यांची स्वीकृत सदस्य म्हणून एकमताने निवड झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुस्तफाभाई खुरेशी यांची एकमताने स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. 19 सदस्यीय केज नगर पंचायतमध्ये 17 नगरसेवक हे जनतेतुन निवडून आलेले असतात तर 2 नगरसेवकांची नियुक्ती स्वीकृत सदस्य (Kwaft Member) म्हणून करण्यात येत आहे.

हारुनभाई इनामदार व मुस्तफाभाई खुरेशी यांची एकमताने निवड झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी नगर पंचायत कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. यावेळी अनेकांची गर्दी पहावयास मिळाली.