इक्बाल शेख
संपादक
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच या परीक्षा येत्या काही महिन्यात ‘TCS’ किंवा ‘MKCL’ या संस्थांमार्फत घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या होत्या. परंतू परीक्षांमध्ये झालेला गोंधळ पाहता ही भरती प्रक्रीया रखडली आहे.
या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या परंतू नियोजित तारखेच्या काही तास आधीच ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचे पेपर आधीच फुटल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले.
परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल़्यानंतरही आरोग्य विभाग ठोस निर्णय घेत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे या दोन्ही संवर्गाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे.
उमेदवारांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही
या परीक्षांसाठी आधी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची तपशीलवार माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे परीक्षा नव्याने राबविण्यात येणार असली तरी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. उपलब्ध माहिती आधारे प्रवेशपत्रासह पुढील माहिती विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. .. वयोमर्यादेमुळे पात्र न ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सूट देण्याची मागणी परीक्षा पुन्हा घेतल्यामुळे काही विद्यार्थी वयोमर्यादेमध्ये बसत नसल्याने या परीक्षेसाठी पात्र न ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही सामान्य प्रशासन विभागाकडे करणार आहोत. परंतु याबाबतचा सेवा नियमनाबाबतच्या नियमावलीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार सामान्य प्रशासन विभागाला आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय या विभागाचा असेल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.