महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे

इक्बाल शेख,
संपादक, 24सात न्यूज


ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग या सारख्या यंत्रणांना हाताशी धरून स्वायत्त संस्थांचा गैरवापर करीत महाराष्ट्राचे राजकारण व संसदेची लोकशाही अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केज येथील पत्रकार परिषदेत केला. 

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या केज येथील आढावा बैठकीसाठी मंगळवारी आल्या होत्या. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख धिंडू पाटील, जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्या तथाकथित शक्तीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्या तथाकथित शक्तीचे देशाचे गृहमंत्री अमित शहा काल महाराष्ट्राचा दौरा करून गेले. शहा हे राज्यातील पीक परिस्थितीवर बोलतील. असे वाटले होते. मात्र हेक्टर आणि एकर या मधला फरक न कळणाऱ्या कृषिमंत्र्यांकडून अहवाल काय मिळाला असणार ? असा टोला त्यांनी लगावला. नवनीत राणा या मेळघाटातील कुपोषणावर, अमरावतीचे प्रश्न आणि मतदार संघ वाऱ्यावर सोडून सांप्रदायिक दंगली का उसळतात ? यावर बोलत नाहीत. अशा चव सोडून बोलणाऱ्या लोकांना आवर घालतील असे वाटले होते. पण शहा त्यांचा दौरा संपूर्ण दौरा आणि भाषण हे उद्धव ठाकरे यांच्यावर होते. त्याचा आम्हाला अभिमान आहे. यातच शिवसेनेची ताकद आहे. यावरून येणाऱ्या निवडणुकात भाजपासमोर शिवसेनेचे आव्हान उभे आहे असे दिसते.

शिवसेनेमध्ये जाणीवपूर्वक अस्थिर वातावरण निर्माण करणाऱ्या लोकांना हे सांगायचे की, शिवसेनेतून राज ठाकरे, नारायण राणे, भुजबळ साहेब हे गेले. तेव्हा फरक पडला नव्हता. शिवसेनेच्या पाठीमागे तळागाळातील शिवसैनिक जोपर्यंत ठामपणे उभा आहे. तोपर्यंत शिवसेना ठामपणे उभी आहे. शिवसेना व शिवसैनिक हे आमदार, खासदार घडवतात. जिव्हाळा, आपुलकी व आदराचा घटक म्हणून शिवसैनिक आहे. शिवसैनिक हा सेनेसोबत ठामपणे उभा आहे. एकेकाळी शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसासाठी व महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी उभी केली होती. परंतु महाराष्ट्राचे राजकारण अमराठी लोक चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोहित कौबोत, नवनीत राणा, किरीट सोमैय्या ही अमराठी नावे आता महाराष्ट्राचे भाग्यविधाते होऊ पाहत आहेत. असे म्हणत त्यांनी सोमैय्या, नवनीत राणा, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली.