पॅन कार्ड आधारला कसं आणि का जोडायचं?

तुमचं पॅन कार्ड आधार कार्डासोबत जोडण्यासाठीची मुदत सरकारनं 30 जून 2021 पर्यंत वाढवून दिली आहे. आधी ही मुदत 31 मार्चपर्यंत होती.

30 जूनपर्यंत तुम्ही पॅन आधार कार्डशी जोडलं नाही, तर त्यानंतर तुमचं पॅन कार्ड स्थगितही होऊ शकतं. ते टाळण्यासाठी जाणून घ्या पॅन कार्ड आधारला कसं जोडायचं आणि का?

तुमचं पॅनकार्ड आणि तुमचं आधारकार्ड ही तुमची दोन महत्त्वाची सरकारी ओळखपत्रं आहेत. आणि आता ती ऑनलाईन जोडणं किंवा एकमेकांना लिंक करणं केंद्र सरकारने अनिवार्य केलंय.

त्यासाठी शेवटची मुदत आहे 30 जून पर्यंतची. तोपर्यंत तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमचं पॅनकार्ड इन अॅक्टिव्ह किंवा तात्पुरतं स्थगित होऊ शकतं.

तुमच्या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल?

पॅन आणि आधार म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घेऊया… पॅन म्हणजे पर्मनंट अकाऊंट नंबर.

आकडे आणि अक्षरं यांचं मिश्रण असलेला हा दहा डिजिट नंबर आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी पॅन अनिवार्य आहे आणि आयकर विभागच तुम्हाला पॅन नंबर आणि लॅमिनेटेड ओळखपत्र देत असतं.

बँकेत खातं उघडताना आणि जवळ जवळ सगळ्याच आर्थिक व्यवहारांच्या वेळी पॅन क्रमांक लागतो. आणि त्याच्या मदतीने आयकर विभागही तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवत असतो.

मोठे गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारला याचा उपयोग होतो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही केंद्रसरकारची एक संस्था आहे. आणि ते आधार ओळखपत्र तुम्हाला देतात. हा एक बारा आकडी क्रमांक आहे जो प्रत्येक नागरिकासाठी वेगळा आहे.