कोरोना रुग्णसंख्या राज्यात प्रचंड वेगाने वाढत आहे तसंच आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला असताना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार एप्रिल आणि मे महिन्यात होणार की पुढे ढकलणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाची आज (7 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली.
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढील इयत्तेत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. पण याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर केली जाईल, असंही शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
याविषयीच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाकडून लवकरच जाहीर केल्या जातील. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांबाबतही अद्याप अंतिम निर्णय झाला नसून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात चर्चा होणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्य शिक्षण मंडळ (बोर्ड), शिक्षणाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक पार पडली. राज्य शिक्षण मंडळाची (SCC,HSC) दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षाही एप्रिल आणि मे महिन्यातच आहेत.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने रविवारी (4 एप्रिल) कडक निर्बंध जाहीर केले. यात बोर्डाच्या म्हणजेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा अपवाद असतील असं सांगण्यात आलं. पण रुग्णसंख्या वाढत असताना परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला मोठ्या संख्येने बोर्डाचे विद्यार्थी आणि पालकांनी विरोध दर्शवला आहे.