मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार आहे. राज्यात कोरोनाला थोपवण्यासाठी लागू करण्यात आलेले ब्रेक द चेन अंतर्गतचे प्रतिबंधात्मक नियम आणखी वाढवण्यात येणार आहेत. हे नियम आणखी 15 दिवसांकरfता वाढवले जाऊ शकतात. कोरोनाला थोपवण्यासाठीच्या उपायोजना, तसेच लसीकरणावर चर्चा करण्यासाठी आज (28 एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली दिली.
कोरोनाच्या संसर्गावर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत कोरोना संसर्ग, लसीकरण आणि ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक नियम यावर चर्चा करण्यात आली. याविषयी माहिती देताना, “ब्रेक द चेनच्या अनुषंगाने आपण लॉकाडाऊन लागू केलेला आहे. आज त्यावरही चर्चा झाली. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या नियमांना लांबवणीवर टाकावंच लागेल. त्यावर सध्या चर्चा झाली. निर्बंधाच्या शेवटच्या दिवशी सध्याचे नियम 15 दिवस हे वाढवायचे की काय करायचं याबाबत चर्चा होईल. ब्रेक द चेनचे नियम आणखी किमान 15 दिवस वाढवले जाऊ शकतात, असा माझा अंदाज आहे,” असे राजेश टोपे म्हणाले.