राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा विचार कराः कोर्टाची सरकारला सूचना

मुंबईः राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. १ मेनंतरही हे निर्बंध वाढवले जाणार असल्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयानंही किमान १५ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करा, अशा सूचना राज्य सरकारला केल्या आहेत.स्नेहा मरजाडी आणि नीलेश नवलखा यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, रेमडेसिवीर, खाटा इत्यादींचा तुटवडा व अन्य प्रश्नांवर जनहित याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबात गंभीर निरीक्षण नोंदवत राज्य सरकाला १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनविषयी सुचवा, असे आदेश राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना केली आहे. किमान १५ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करा कारण सध्याच्या निर्बंधांनंतर आजही लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. यातून हेतू साध्य होणार नाही.अत्यंत अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर येण्याची परवानगी द्यावी. १५ दिवसांसाठी हा उपाय केला तर करोनाला अटकाव केला जाऊ शकतो, अशा सूचना मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला केल्या आहेत.