आडसच्या भोंदूबाबापासून समाजाचे शोषण थांबवा – अंधश्रध्दा निर्मुलन समिती

केज: तालुक्यातील आडस येथील भोंदूबाबा वैजनाथ बळीराम म्हेत्रे (महाराज) हा गेली 20 वर्षांपासून आडस, केज, धारूर व परिसरातील सामान्य, गरीब व भोळ्याभाबड्या लोकांना गुप्तधन काढून देतो, करणी, भानामती व भूत बाधेपासून मुक्ती देतो असे सांगून लाखो रुपये उकळत असून जनसामान्यांचे आर्थिक , मानसिक व लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारी असून किल्ले धारूर पोलीस स्टेशन ने त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर तात्काळ कार्यकाही करून गरीब व सामान्य लोकांचे शोषण तात्काळ थांबवावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बीड जिल्हा कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी केले आहे.

याबाबत माहिती अशी की आडस ता केज येथे वैजनाथ बळीराम म्हेत्रे (महाराज) नावाचा भोंदू व्यक्ती लोकांना आपल्याकडे रिद्धीसिद्धी प्राप्त आहे असे सांगून गुप्तधन, करणी, भानामती, भूतबाधा यासह इतर समस्यांचे निराकरण करतो असे सांगून मोठी रक्कम घेतो. या व्यक्तीने भोंदूगिरी व फसवेगिरी द्वारे खूप पैसे कमावले असून आता तो आपल्या आर्थिक ताकदीचा वापर गुन्हेगारी साठी वापरून दहशत निर्माण करतो.त्यामुळे गेली कित्येक वर्षे कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र आता महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागु करण्यात आल्याने आता अशा लोकांचे हे कृत्य या कायद्यानुसार मोठा गुन्हा असून त्यासाठी जबर शिक्षे ची तरतूद आहे. यापूर्वीच बीड जिल्हा अंनिस ने याबाबावर पाळत ठेवलेली आहे मात्र तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. मात्र या भोंदू बाबांच्या विरोधात आडस येथीलच श्रीमती स्वाती दत्ता खाडे यांनी या बाबाने गुप्तधन व इतर समस्यांचे निवारण करण्यासाठी जवळपास सहा लाख रुपये उकळळ्याचे तक्रारधारकाचे म्हणणे आहे.
असे भोंदू लोक आपल्यावरील कार्यवाही टाळण्यासाठी आपली राजकीय व आर्थिक ताकद वापरतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांना प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडून मदत मिळते. त्यामुळेच अशी भोंदूगीरी अधिक पसरत आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्ण ताकदीने तक्रारदार श्रीमती स्वाती दत्ता खाडे यांच्या पाठीशी उभी राहणार असून वरील भोंदू व्यक्तीला अटक करून त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणीही बीड जिल्हा अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात वरील व्यक्तीला अटक न झाल्यास शुक्रवार दि 21 मे 2021 पासून साथ रोग कायद्याचे संपूर्ण पालन करून दोन प्रतिनिधी किल्ले धारूर पोलीस स्टेशन समोर दररोज सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीने किल्ले धारुर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.