राज्यात म्युकरमायकोसिसचे एक हजार रुग्ण! कुठे आहेत सर्वाधिक रुग्ण

मुंबई,
24सात । मराठी

राज्यात म्युकरमायकोसिसचे 1 हजार सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत. म्युकरमायकोसिसचे पुण्यात 273 रुग्ण आहेत. त्यानंतर नागपुरमध्ये 148 रुग्ण आहेत. औरंगाबादमध्ये 67 रुग्ण आहेत. नांदेडमध्ये 60, चंद्रपुरात 48, लातूर 28 तर ठाण्यात 22 रुग्ण आहेत. यामुळे आता पुणेकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

पण, या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे एम्पोटेरेसिन इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही जिल्ह्यांत तर इंजेक्शनच उपलब्ध नाहीत. दरम्यान राज्यासाठी दिलासादायक बातमी म्हणजे काही जिल्ह्यांत म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही. यामध्ये गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता राज्यात वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.