जून महिन्यापासून लहान मुलांवर होणार कोरोना लसीची चाचणी

ब्युरो रिपोर्ट,
24सात | मराठी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा इशारा आतापर्यंत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लहान मुलांच्या संरक्षणासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जून महिन्यांपासून लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात होणार आहे.

भारत बायोटेकचे अधिकारी डॉ. राचेस एल्ला यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. आम्ही जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या पीडियाट्रिक ट्रायलला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटना लहान मुलांवर कोव्हॅक्सिनचा वापर करण्यासाठी परवानगी देईल, अशी आशा डॉ. राचेस एल्ला यांनी व्यक्त केली.

सध्या कोव्हॅक्सिनचे उत्तम परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत. आम्ही लवकरच लसीचे उत्पादन वाढवू. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत आम्ही 70 कोटी लसींचे उत्पादन करु, असा दावाही डॉ. राचेस एल्ला यांनी केला. केंद्र सरकारने भारत बायोटकेला 1500 कोटी रुपयांच्या कोरोना लशींची ऑर्डर दिली आहे.

नेझल व्हॅक्सिन ठरणार गेमचेंजर

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथ यांनी भारतामध्ये तयार होत असलेली नेझल व्हॅक्सीन गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुलांना लस देणे आणखी सोपे होईल. लहान मुलांच्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत आपल्याला लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होईल, असे सौम्या स्वामिनाथ यांनी म्हटले.

टास्क फोर्स ने दिला सल्ला

करोना संसर्गाची तिसरी लाट आल्यास मुलांना वैद्यकीय उपचार कसे करावेत यासंदर्भात बालरोगतज्ज्ञांना रविवारी मार्गदर्शन करण्यात आले. त्यात राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील दोन हजार डॉक्टर उपस्थित होते. पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, व्हायरल तापाचाही जोर असतो. स्वाइन फ्लूचाही फैलाव होऊ शकतो. त्यामुळे मुलांना आलेला प्रत्येक ताप हा करोना संसर्गाचा ताप आहे, असे समजून घाबरून जाऊ नका. मुलांना करोनाच झाला या भीतीची लाट ही प्रत्यक्ष करोना संसर्गापेक्षा अधिक घातक असू शकते, असेही यावेळी बालरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले.