“प्रवाशांच्या सेवेसाठी” एसटी बस सेवा पुन्हा सुरु होणार का?

इक्बाल शेख,
24सात । मराठी

राज्यात अधिक कडक निर्बंधामुळे बंद असलेल्या एसटी गाड्या आता पुन्हा एकदा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ धावण्यास सज्ज होत आहेत. राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी सुरू करण्यासाठी राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

एसटी बंद असल्याने धूळखात असलेल्या गाड्यांची साफसफाई आणि देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. पावसाळा लक्षात घेता गळकी छते, नादुरुस्त खिडक्या, चालकासमोरील वायपर ही कामे प्राधान्याने करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत एसटी फेऱ्या सुरू होणार असल्याने, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोना प्रादुर्भावामुळे बीड जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती.

एप्रिल-मे महिन्यादरम्यान बीड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे वाढत असलेल्या रुग्ण संख्येने दिड हजारांचा टप्पा पार केला होता. ज्यामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातील बस सेवा पुर्णतः बंद ठेवण्यात आली होती. मे महिन्याच्या अखेरीस कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे.

काय म्हणाले विभागीय बीड जिल्हा नियंत्रक

बीडचे मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत विभागीय कार्यालयाला अद्याप कोणतेही पत्र आलेले नाही. तसेच गाड्या सुरू करण्याबाबत काही आदेशही मिळालेला नाही. यामुळे जिल्हांतर्गत ये-जा करणाऱ्या बस सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहेत. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एसटी मालवाहतूक सेवा सुरू आहे. मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 31 मे पर्यंत कडक लाॅकडाऊन असल्याने बस सेवा बंद राहतील. त्यापुढील काळात त्यांच्या आदेशानुसार बस सेवा सुरु करण्यात येईल असे एसटी महामंडळाचे विभागीय जिल्हा नियंत्रक कालिदास लांडगे यांनी 24सात न्यूज शी बोलताना म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाराचा योग्य वापर

करोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यातील अर्थचक्र पुन्हा वेगाने सुरू करण्यासाठी, करोना संकटाचे मळभ दूर सारून नव्याने सुरुवात करण्यासाठी‌ जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाराचा योग्य वापर होत असुन ते येणाऱ्या काळात नागरीकांसाठी दिलासादायक आदेश काढतील अशी जनसामान्यातुन अपेक्षा व्यक्त केली जात आहे.